वीज चोरी भोवली; चोरी करणाऱ्यास न्यायालयाने ठोठावली सक्तमजुरी

अहमदनगर- कंपनीतील वीज मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी केल्याबद्द्ल एकाला दोन वर्ष सक्तमजुरी आणि १५ हजार रूपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी ठोठावली. पाराजी नारायण रोकडे (रा. निंबळक, ता. नगर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. ॲड. उज्वला थोरात – पवार यांनी सरकारतर्फे काम पाहिले.
पाराजी नारायण रोकडे याची एमआयडीसीमध्ये अजित फुड्स नावाची कंपनी आहे. वीज कंपनीचे सहायक अभियंता किरण हरी महाजन तसेच रमाकांत भागचंद गर्जे व इतर कर्मचारी आणि पंचांनी ता. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी दुपारी २ वाजता अजित फुड्स कंपनीमधील वीज जोडणीची तपासणी केली. रोकडे याने वीज जोडणी मीटरमधील दोन स्टड कापून वीज मिटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी करत होता.
वीज मिटरची चाचणी केली असता, ३४ हजार १२ ९ युनिट (किंमत ४ लाख २४ हजार २८०रूपये) वीज चोरी केल्याचे आढळून आले. सदर गुन्ह्यासाठी तडजोड आकार १० लाख आरोपीने भरला नाही. किरण महाजन यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुध्द भारतीय विद्युत अधिनियम (सुधारणा) २००३ नुसार गुन्हा दाखल केला. या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे ५ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये फिर्यादी, पंच साक्षीदार, तांत्रिक अधिकारी यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या.
रोकडेविरूद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने त्याला दोन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा आणि १५ हजार रूपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. एम.आय.डी.सी. पोलिस ठाण्याचे पोलिस अंमलदार प्रबोध हंचे, धुमाळ यांनी पैरवी अधिकारी म्हणून सहकार्य केले.