अल्पवयीन मुलासह करायचा दुचाकींची चोरी; पोलिसांनी केले गजाआड

अहमदनगर- केडगाव, सुपा व शिरूर (जि. पुणे) परिसरातून दुचाकी व मोबाईल चोरणार्या फरहान फिरोज खान (वय 21 रा. हिनापार्क, मुकुंदनगर) याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून त्याचा अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे.
त्यांच्याकडून सात दुचाकी व एक मोबाईल असा दोन लाख 85 हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. केडगावातील संकेत विठ्ठल सातपुते (वय 22) यांची दुचाकी चोरीला गेली होती. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यासह इतर दुचाकी चोरीचा गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलीस अधीक्षक राकेश ओला, निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पथक काम करत होते.
निरीक्षक कटके यांना माहिती मिळाली की, फरहान खान हा साथीदाराच्या मदतीने नगर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणांवरून दुचाकी चोरी करून विक्री करतो. तो मुकूंदनगर येथील त्याच्या राहत्या घरी आला आहे. या माहितीच्या आधारे त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान गोरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकास खात्री करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. या पथकाने आरोपीच्या घराजवळ सापळा लावून थांबले. खबर्याच्या वर्णनाप्रमाणे दिसणारा एक संशयीत व्यक्ती येताना दिसला. त्यास त्याचे नाव विचारले असता. त्याने फरहान फिरोज खान (वय 21, रा. हिनापार्क, मुकूंदनगर) असे असल्याचे सांगितले.
त्याच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत चौकशी केल्यावर तो समाधानकारक उत्तरे न देता उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला. त्यास विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्याने साथीदारासह दीड ते दोन महिन्यापूर्वी नगर, सुपा व शिरूर येथून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. विविध कंपनीच्या सात दुचाकी व एक मोबाईल त्याच्याकडे मिळून आला. त्याचा साथीदार हा एक अल्पवयीन मुलगा असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.