मंत्र्यांच्या तालुक्यात चोरटे सक्रिय…. 5 महिन्यांत शेतकर्यांच्या 17 पाणबुडी मोटारी चोरीस

संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाच महिन्यांत शेतकर्यांच्या 17 पाणबुडी मोटारी चोरीस गेल्या आहे.
विशेष बाब म्हणजे चोरीच्या एवढ्या घटना होऊन देखील अद्यापही मोटारी चोरणार्या चोरट्यांचा शोध लागला नाही आहे. यामुळे शेतकर्यांनी पोलीस प्रशासनाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, संगमनेर तालुक्यातील घारगाव, हिवरगाव पठार, चिंचेवाडी सारोळेपठार, बोटा, केळेवाडी या गावांमधून शेततळे, विहीर,
पाझर तलाव यांच्यामधून अज्ञात चोरट्यांनी पाणबुडी मोटारी चोरून नेल्या आहेत तर केळेवाडीच्या पाझर तलावातून एकाच रात्री 11 शेतकर्यांच्या 12 पाणबुडी मोटारी चोरी गेल्याची घटना घडली आहे.
यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. दरम्यान मोटारी चोरी होवूनही शोध लागत नसल्यामुळे चोरटे देखील अधिक निर्धास्त झाले असून आणखी सक्रिय झाले आहे. सततच्या चोर्यांमुळे शेतकरी अक्षरशः वैतागले आहे.
मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणबुडी मोटारी चोरी जावूनही अद्याप तरी एकाही पाणबुडी मोटारीचा शोध लागला नाही. पाणबुडी मोटारी चोरीचा सिलसिला सुरूच राहिल्याने शेतकरी चांगलेच संतप्त झाले आहेत. त्यामुळे घारगाव पोलिसांनी तात्काळ मोटारी चोरणार्या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे.