भरदिवसा चोरट्यांचा धुमाकूळ ! सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला..

श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण परिसरातील निंबोडीवाडी येथे बाळासाहेब लक्ष्मण शेटे यांच्या बंद घराचा दरवाजा उघडून अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा घरात घुसून सुमारे एक लाख ८५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबवले.
या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनास्थळी सपोनि दिलीप तेजनकर यांनी भेट देऊन पाहणी केली.
या बाबत सविस्तर असे की, श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथील निंबोडीवाडी येथील बाळासाहेब लक्ष्मण शेटे हे आपल्या रस्त्याच्याकडेला असलेल्या शेतामध्ये राहतात. दि.४ रोजी सकाळी पत्नीसह शेतात कांदे भरण्यासाठी गेले होते.
काम आटोपून ते दुपारी अडीचच्या सुमारास शेतातून परत आले. यावेळी त्यांना घराचे कुलूप तोडले असल्याचे लक्षात आले नंतर त्यांनी घरात प्रवेश करताच घरातील सर्व साहित्याची उचकपाचक करून अस्ताव्यस्त टाकले होते.
त्यामुळे त्यांनी कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने पाहिले असता सुमारे एक लाख ८५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी झाल्याचे लक्षात आले. याबाबत त्यांनी श्रीगोंदा पोलिसांना कळविताच सपोनि दिलीप तेजनकर हे पोलिस पथकासह तातडीने श्वानपथकासह घटनास्थळी हजर होउन आजूबाजूला शोध घेतला.
माञ कोणताही माग निघून आला नाही. या प्रकरणी शेटे यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिसांनि अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून याबाबत अधिक तपास सपोनि दिलीप तेजनकर हे करत आहेत.