अहमदनगर

भाव वाढल्याने चोरट्यांचा कापसावर डोळा; चोरीमुळे शेतकरी हैराण

अहमदनगर- जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जो काही माल शिल्लक राहिला त्याची चोरी होत आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. सोयाबीन चोरी बरोबर आता शेतकऱ्यांच्या शेतामधील कापूस चोरटे चोरून नेत आहेत.

 

नेवासा तालुक्यातील सोनई जवळील श्रीरामवाडी येथे राहत्या घराच्या आवारातून सुमारे 36 हजार रुपये किमतीच्या 21 गोण्या कापसाची चोरी झाल्याची घटना घडली असून याबाबत सोनई पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, सध्या कापसाला बर्‍यापैकी बाजारभाव मिळत असल्याने कापसाच्या चोर्‍यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात श्रीरामवाडी येथीलच तुकाराम निमसे यांच्या शेतातून उभ्या असलेल्या झाडांच्या कापसाची चोरी झाली होती. दुसरी घटना त्याच गावातील अरुण गंगाधर बेल्हेकर यांच्या बाबतीत घडली. दोन-तीन दिवसांपासून शेतात कापसाची वेचणी करून तो राहत्या घराच्या पडवीमध्ये साठवून ठेवत होते.

 

6 नोव्हेंबर रोजी दिवसभरात वेचणी केलेला कापूस घराच्या पडवीत 21 गोण्यांमध्ये भरून ठेवलेला होता. रात्री 11 ते पहाटे सहा वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी राहत्या घराच्या पडवीमधून हा कापूस चोरून नेला. सकाळी उठल्यावर आपण काल वेचणी केलेल्या सुमारे 36 हजार रुपये किमतीच्या कापसाची चोरी झाल्याचे निदर्शनास आले. श्री. बेल्हेकर यांच्या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार श्री. अकोलकर करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button