चोरट्यांनी मारला पेट्रोलपंपाच्या तिजोरीवर डल्ला; 10 लाखांची रोकड घेऊन झाले पसार

अहमदनगर- पेट्रोलपंपामधील रूमचे कुलूप तोडून नऊ लाख 63 हजार 940 रूपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. नगर-औरंगाबाद रोडवरील वांबोरी फाट्याजवळ शेंडी (ता. नगर) शिवारात असलेल्या विठ्ठल हायवे पेट्रोलपंपावर ही घटना घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेट्रोलपंपाचे मॅनेजर संदीप भाऊसाहेब गवते (वय 33 रा. मोरे चिंचोरे ता. नेवासा) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना रविवारी दुपारी तीन ते सोमवारी सकाळी साडे आठ वाजेच्या दरम्यान घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) अजित पाटील, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक युवराज आठरे यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली आहे. नगर-औरंगाबाद रोडवरील वांबोरी फाट्याजवळ शेंडी शिवारात विठ्ठल हायवे नावाचा पेट्रोलपंप आहे.
या पंपावर संदीप गवते हे मॅनेजर म्हणून काम करतात. रविवारी दुपारी तीन वाजेच्यानंतर अज्ञात चोरट्यांनी पेट्रोलपंपाचे रूमचे मागील दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. रूममधील तिजोरी फोडून त्यातील नऊ लाख 63 हजार 940 रूपयांची रक्कम चोरून नेली. ही घटना काल (सोमवारी) सकाळी साडे आठ वाजता लक्ष्यात आली. यानंतर एमआयडीसी पोलिसांना याची माहिती देण्यात आली. या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक हंडाळ करीत आहेत.