अहमदनगर

फॉर्म हाऊसवर चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेला मारहाण करत साडेआठ तोळे लांबविले

अहमदनगर- फॉर्म हाऊसवर चोरट्यांनी पहाटे धुमाकूळ घालत साडेआठ तोळे सोन्याचे दागिने व पाच हजार रूपये रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला आहे. नगर-औरंगाबाद रोडवरील पोखर्डी (ता. नगर) शिवारात असलेल्या घुले फॉर्म हाऊसवर ही घटना घडली आहे.

 

चोरट्यांच्या मारहाणीत एक महिला जखमी झाली आहे. भाग्यश्री अभिषेक घुले (रा. पोखर्डी) असे जखमी महिलेचे नाव आहे. या प्रकरणी दोन चोरट्यांविरूध्द येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शारदा शंकरराव घुले (वय 65) यांनी फिर्याद दिली आहे.

 

सोमवारी रात्री साडेअकरा वाजता घुले कुटूंब घरात झोपले होते. मंगळवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास दोन चोरट्यांनी घुले यांच्या बंगल्याच्या समोरील व पाठीमागील दरवाजाचे ग्रिल आणि लाकडी दरवाजा कशाचे तरी सहाय्याने तोडून आत प्रवेश केला. चोरटे घरात येताच त्यांनी वरच्या मजल्यावरील दोन बेडरूमचे दरवाजा तोडून आत प्रवेश केला.

 

बेडरूममध्ये ठेवलेले तीन तोळ्याचे सोन्याचे गंठण, दोन तोळ्याचे मिनी गंठण, एक तोळ्याचे कानातील लोंबते झुंबे, आर्धा तोळ्याचे वेल, एक तोळ्याचे मुलांच्या कानातील जोड, मनगटे, चैन व एक तोळ्याची अंगठी असा साडेआठ तोळ्यांच्या सोन्याच्या दागिन्यांसह पाच हजार रूपयांची रोख रक्कम चोरली.

 

चोरट्यांनी भाग्यश्री घुले यांच्या उजव्या पायावर कशानेतरी मारहाण करून गंभीर दुखापत केली. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच चोरट्यांनी फिर्यादी यांना चाकूचा धाक दाखवून भोसकुन टाकण्याची धमकी दिली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) अजित पाटील, सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चाहेर करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button