सैनिकांच्या वर्दीची विक्री केल्यास होणार ‘ही’ कारवाई; नगरमध्ये सैन्यदलाकडून…

अहमदनगर- सैनिकांची वर्दी परिधान करून आलेल्या तोतया सैनिकांकडून अनेकांची फसवणूक केली जात आहे. यापूर्वी नगरसह जिल्ह्यात असे अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. सैन्य दलात भर्ती होण्यासाठी प्रयत्न करणार्या अनेक तरूणांची यामुळे फसवणूक झाली आहे.
दरम्यान आता सैनिकांच्या वर्दीची अनधिकृत खरेदी-विक्री करणे, वापर करण्यास भारतभर सक्त मनाई करण्यात आली आहे. अनधिकृत दुकानदाराणे याची विक्री केल्याचे आढळून आल्यास भारतीय सैन दलाकडून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
दरम्यान नगर जवळील दरेवाडी, वाकोडी फाटा येथे सैन दलाच्या जवानांनी सोमवारी काही दुकानांना भेटी देत तपासणी करून त्यांना सूचना केल्या. यावेळी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार उपस्थित होते.
यापूर्वी सैनिकांच्या वर्दीची (शर्ट, पॅन्ट, टोपी, जाकेट) सार्वजनिक ठिकाणी, दुकानामध्ये विक्री करण्यास परवानगी होती. यामुळे नगरजवळील भिंगार, दरेवाडी, वाकोडी फाटा येथील दुकानामध्येही सैनिकांच्या वर्दीची सर्रास विक्री केली जात होती. येथील अनेक दुकानात सैनिकांच्या वर्दीचे शिवणकाम केले जात होते.
भारतीय सेनेच्या मालकीची संपत्ती असलेल्या वर्दीची डिझाईन सेनेनी तयार केलेली आहे. या वर्दीची सार्वजनिक ठिकाणी खरेदी व विक्री करण्यास सैन्य दलाने बंदी घातली आहे. अधिकृत करारनामा केलेल्या दुकानामध्येच या वर्दीची विक्री करता येणार आहे. यासाठी सैन्य दलाने नियमावली तयार केली आहे.
या नियमावलीसह जनजागृतीचे काम ठिकठिकाणी सुरू करण्यात आले आहे. नगरजवळील सैन्य दलाच्या जवानांनी सोमवारी दरेवाडी, वाकोडी फाटा येथील काही दुकानांना भेटी दिल्या. तेथे सैन्य दलाच्या वर्दीची विक्री केली जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबत दुकानदारांना सुचना करून यापुढे सैनिकांची वर्दी खरेदी करून विक्री करण्यासाठी मनाई केली आहे.
दरम्यान यापुढे एखाद्या दुकानामध्ये सैनिकांची वर्दीची विक्री होताना आढळून आल्यास त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे. त्याच्या दुकानाचा परवाना रद्द करण्यापासून संबंधीत व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल केला जाणार आहे.