अहमदनगर

हे आहे राहण्यासाठी जगातील सर्वोत्कृष्ट शहर !

कोरोना महामारीचा यशस्वीरीत्या सामना करणाऱ्या न्यूझीलंडमधील ऑकलंड शहर हे राहण्याच्या दृष्टिकोनातून जगातील सर्वोत्कृष्ट शहर ठरले आहे. यापाठोपाठ जपानमधील ओसाकाने दुसरे, तर ऑस्ट्रेलियातील ॲडिलेडने तिसरे स्थान पटकावले आहे.

राहण्यासाठी सर्वोत्कृष्ट असलेल्या टॉप १० शहरांमध्ये ऑस्ट्रेलियातील चार शहरांसह न्यूझीलंड, जपान आणि स्वीत्झर्लंडमधील प्रत्येकी दोन शहरांचा समावेश आहे, तर गृहयुद्घाच्या आगीत होरपळणाऱ्या सीरियाची राजधानी दमस्कस हे सलग नवव्या वर्षी राहण्यासाठी सर्वात वाईट शहर ठरले आहे.

इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने (इआययू) २०२१ सालासाठी राहण्यासाठी सर्वोत्कृष्ट असलेल्या जगभरातील शहरांची रॅकिंग जारी केली आहे. स्थिरता, आरोग्याच्या सुविधा, संस्कृती, पर्यावरण, शिक्षण आणि पायाभूत सुविधांच्या आधारे जगभरातील १४० शहरांची रॅकिंग ठरविण्यात आली आहे.

त्यानुसार या रॅकिंगमध्ये ९६ अंकासह ऑकलंड शहराने पहिल्या क्रमाकांवर बाजी मारली आहे. यापाठोपाठ ओसाका शहर ९४.२ अंकासह दुसऱ्या, तर ॲडिलेड ९४ अंकासोबत तिसऱ्या स्थानावर आहे; परंतु ब्रिटनची राजधानी लंडन आणि अमेरिकेतील गजबजलेल्या न्यूयॉर्क शहराला टॉप ५० मध्येदेखील जागा मिळाली नाही.

कोरोनाचा प्रभावीपणे सामना केल्यामुळे ऑकलंडला पहिले स्थान देण्यात आल्याचे इआययूने म्हटले आहे. न्यूझीलंडमधील वेलिंग्टन आणि जपानची राजधानी टोकियो हे संयुक्तपणे चौथ्या स्थानावर आहेत.

टॉप १० शहारामध्ये ऑस्ट्रेलियाच्या पर्थ, मेलबर्न आणि ब्रिस्बेन या शहरांचा समावेश आहे, तर स्वित्झर्लंडमधील झुरिच आणि जिनिव्हा या शहरांनीदेखील यात जागा पटकावली आहे. राहण्यासाठी सर्वात वाईट असलेल्या टॉप १० शहरामध्ये सीरियाची राजधानी पहिल्या स्थानावर आहे.

या यादीत दुसऱ्या स्थानावर नाजेरियातील लागोस, तर तिसऱ्या क्रमांकावर पापुआ न्यू गिनीतील पोर्ट मोरेस्बी शहर आहे. पाकिस्तानमधील कराची शहर या यादीत सातव्या क्रमाकांवर आहे. उल्लेखनीय म्हणजे कोरोना महामारीच्या संकटामुळे यंदाच्या क्रमवारीत अनेक उलथापालथ दिसून आल्या आहेत.

प्रामुख्याने युरोप आणि कॅनडातील शहरांना याचा फटका बसला आहे. यापूर्वी राहण्यासाठी जगातील सर्वोत्कृष्ट शहर ठरलेले व्हिएन्ना हे घसरून १२ व्या स्थानावर फेकले गेले आहे. यापूर्वी ३४ व्या क्रमांकावर असलेले जर्मनीतील हमबर्ग घसरून ४७ व्या स्थानावर पोहोचले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button