अहमदनगर

कोरोनामुक्त करण्यासाठी ही आहे ‘गरज’ वाचा काय म्हणाले महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

कोरोनाचा वेग मंदावला असला तरी धोका टळलेला नाही. त्यामुळे कोणीही निष्काळजीपणा करू नका. संगमनेर तालुका कोरोनामुक्त करायचा आहे. यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. साकुर येथील वीरभद्र लॉन्स येथे कोरोना उपाय योजनांबाबत झालेल्या आढावा बैठकीत ना. थोरात बोलत होते.

यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, इंद्रजीत खेमनर, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, पोलीस निरीक्षक सुरेश पाटील, अशोक हजारे, पांडुरंग सागर, ताराबाई धुळगंड, पंचायत समिती सदस्य किरण मिंडे यांसह पठार भागातील विविध गावांमधील सरपंच व विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री थोरात म्हणाले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये शहरांपेक्षा ग्रामीण भागात मोठी वाढ झाली आहे. याचे कारण ग्रामीण भागामध्ये मध्यंतरी झालेले समारंभ आहेत. ही वाढ आपल्याला पूर्णपणे थांबवायची आहे. सध्या संगमनेर तालुक्यामध्ये ५० गावे कोरोनामुक्त झाली असून संपूर्ण तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी सर्वांना काळजी घ्यावी लागणार आहे.

कोरोनाबाबत कोणतीही शीतलता बाळगू नका. तो कधीही परत होऊ शकतो. एक व्यक्ती बाधित झाली तर त्याचे कुटुंब बाधित होते आणि त्याचा संपूर्ण आर्थिक मानसिक व शारीरिक त्रास त्या कुटुंबाला होतो. म्हणून या संकटापासून दूर राहण्याकरता स्वत:सह कुटुंबीयांची काळजी घ्या.

विनाकारण बाहेर फिरू नका. कोणतीही लक्षणे आढळली तर तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन स्वत:चे विलगिकरण करा. यासाठी गावातील स्थानिक युवकांनी प्रशासनाला मदत करा, असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक शंकरराव खेमनर यांनी केले तर इंद्रजीत खेमनर यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button