Ahmednagar News: घरावर ताबा घेण्यासाठी धमकी; 10 लाखांची मागणी

Ahmednagar News :सावेडी उपनगरात गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून सर्वसामान्यांची मालमत्ता बळकाविण्याचे प्रकार वाढले आहेत. असाच एक प्रकार पुन्हा समोर आला आहे.
घर बळकावून घेवु व तुम्हाला कोणाला जिवंत ठेवणार नाही, असे जर होवु द्यायचे नसेल तर तुम्ही आम्हाला 10 लाख रूपये द्या, असे म्हणत एका कुटूंबाला धमकी देण्यात आली.
सावेडी उपनगरातील पाईपलाइन रोड येथील समर्थनगरमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी अभिजीत भिमराव शिंदे (वय 33 रा. मनिषा रो. हाऊसिंग सोसायटी, समर्थनगर, पाईपलाइनरोड) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून 15 ते 16 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमाकांत किसन थोरवे, संगिता किसन थोरवे, लता बडे (पूर्ण नाव माहिती नाही), तुषार उमाकांत थोरवे व 10 ते 12 अनोळखी इसम यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.
पोलिसांनी उमाकांत थोरवे याला अटक केली आहे. फिर्यादी शिंदे यांचे पाईपलाइन रोडवरील समर्थनगरमधील मनिषा रो हौसिंग सोसायटीमध्ये घर आहे. ते घर त्यांच्या वडिलांच्या नावावर आहे.
त्या घरामध्ये उमाकांत थोरवे घुसून राहत असल्याबाबत ऑगस्ट 2021 मध्ये फिर्यादी यांच्या वडिलांनी याबाबत तक्रार दिली होती. त्यानंतर थोरवे हे घर सोडून कुटूंबासह निघुन गेले होते.
यानंतर फिर्यादी त्या घरामध्ये राहण्यासाठी गेले होते. सोमवारी सकाळी फिर्यादी त्यांच्या कुटूंबासह घरामध्ये असताना आरोपी तेथे आले. ते फिर्यादीला म्हणाले,‘आम्ही तुमचे घर खाली केले आहे.
त्याचे आम्हाला 10 लाख रूपये द्या, नाहीतर आम्ही पुन्हा तुमच्या घरावर ताबा घेऊ, तुम्हाला घराबाहेर काढू, जर तुम्ही तसे केले नाही तर तुम्हाला कोणालाही जिवंत सोडणार नाही व तुमच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करू, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.