तब्बल दीड कोटी रूपयांच्या स्टीलची हेराफेरी करणाऱ्यांना पोलिसांकडून अटक

स्टीलची वाहतूक करणार्या वाहनांमधून स्टीलची चोरी करून ते काळ्या बाजारात विक्री करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी 2 ठिकाणी छापेमारी करून तब्बल दीड कोटी रूपयांचा माल जप्त केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात 14 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिली कारवाई
राजसिंगानिया राजेश्वर सिंगानिया (वय 42), राहुलकुमार कोलई राव (वय 29), राजेश राव रामफेर (वय 34, तिघे रा. उत्तर प्रदेश, हल्ली मुकाम हॉटेल निलकमल शेजारी) हे रामभाऊ सानप (मूळ रा. पाटोदा, जि. बीड, सध्या रा. नगर) याच्या सांगण्यावरून नगर-औरंगाबाद महामार्गावरून जाणार्या स्टील (असारी) वाहतूक करणार्या वाहन चालकांशी संगनमत करत होते.
त्यांनी ट्रेलरवरील चालक व हेल्पर प्रमोद छबू भांगर (वय 22 रा. भावाळा ता. पाटोदा जि. बीड), संदीप मोहन सांगळे (वय 27 रायाळ ता. पाटोदा जि. बीड) यांच्यासह इतर वाहन चालकांशी संगनमत करून स्टील वाहतूक करणारी वाहने पत्र्याच्या कंपाऊंडमध्ये नेवून ठेवले होते. पथकाने छापा टाकून 37 लाख 73 हजार 116 रूपये किंंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
दुसरी कारवाई
खोसपुरी शिवारात नगर- औरंगाबाद महामार्गावर एका हॉटेल शेजारी असलेल्या पत्र्याच्या कंपाऊंडमधील मोकळ्या जागेत करण्यात आली.
मूळ मालक आदिनाथ रावसाहेब आव्हाड (वय 36 रा. पांगरमल ता. नगर) याच्या सांगण्यावरून कामगार ऋषिकेश रामकिसन वाघ (वय 22 रा. वाघवाडी ता. नेवासा), चेतन राजेंद्र हरपुडे (वय 22), शिवाजी नामदेव कुर्हाटे (वय 30),
गोरक्षनाथ आसाराम सावंत (वय 28, तिघे रा. शिंगवे तुकाई ता. नेवासा) यांनी स्टिल (असारी) वाहतूक करणार्या वाहनांचे (एमएच 21 बीएच 4864 व एमएच 12 एसएक्स 9899) चालक व हेल्पर तात्याराव अशोक सपरे (वय 35) परशुराम अशोक सपरे (वय 25, दोघे रा. महाकाळा ता. अंबड, जि. जालना),
शैलेश ज्ञानोबा तांदळे (वय 24 रा. हिंगणी जि. बीड) यांच्यासह इतर वाहन चालकांशी संगनमत करून स्टिलची चोरी करताना व ते काळ्या बाजारात विक्री करण्याचे उद्देशाने साठवणूक करून ठेवली असताना आढळून आले. या ठिकाणी पथकाने एक कोटी 10 लाख 88 हजार 929 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.