अहमदनगरताज्या बातम्या

अकरा उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या, जिल्ह्यातील या तालुक्यांना नवे प्रांत…

जिल्हा प्रशासनातील तब्बल अकरा उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाचे सहसचिव डॉ.माधव वीर यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

यात जिल्हा प्रशासनातील नगर, श्रीगोंदे, कर्जत, श्रीरामपूर आणि शिर्डी प्रांताधिर्कायांसह उपजिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी आणि भूसंपादन अधिकारी यांचा समावेश आहे. मंगळवार दि.११ रोजी राज्य शासनाचे हे आदेश जारी झाले असून यात कोकण, पुणे, नाशिक, अमरावती नागपूर आणि औरंगाबाद या महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्याचा समावेश आहे.

नगर जिल्हा प्रशासनातील उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून कार्यरत असलेले जितेंद्र पाटील यांची बदली जळगाव जिल्ह्यातील भुसावळ ते प्रांताधिकारी म्हणून करण्यात आली आहे. त्यांच्या जागी उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून जळगावचे निवासी उपजिल्हाधिकारी असलेले राहुल पाटील यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.

राहुल पाटील यांनी जिल्हा प्रशासनात रोहयो उपजिल्हाधिकारी तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून कामकाज पाहिले आहे. महसूल उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या उर्मिला पाटील यांची नेमणूक रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन प्रांताधिकारी म्हणून करण्यात आली आहे.

त्यांचे जागी नाशिकचे जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांची बदली जळगाव येथे भूसंपादन अधिकारी म्हणून झाले आहे. त्यांच्या जागी जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून नागपूर पेंच प्रकल्प भूसंपादन अधिकारी असलेल्या हेमा बढे यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.

हेमा बढे यांनी जिल्हा प्रशासनात महसूल शाखेच्या चिटणीस आणि जिल्हा निवडणूक शाखेत तहसीलदार म्हणून कामकाज पाहिले आहे.

नगर प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्या जागी आता परभणी जिल्ह्यातील गंगाखेडचे प्रांताधिकारी असलेले सुधीर पाटील यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. सुधीर पाटील यांनी पूर्वीच्या काळात नगर तहसीलदार तसेच जिल्हा निवडणूक शाखा तहसीलदार म्हणून कामकाज पाहिले आहे.

कोरोना संकटात योगदान

बदलून जाणारे प्रातांधिकारी व उपजिल्हाधिकारी साधारणपणे २०१९ पासून जिल्ह्यात कार्यरत होते. पुढे कोरोनाचे संकट असताना तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेवी व नंतर जिल्हाधिकारी भोसले यांच्या नेतृत्वाखाली या सर्वांनीच सोपवलेली जबाबदारी पार पाडली.

प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, सुधाकर भोसले, अनिल पवार, गोविंद शिंदे यांनी तसेच उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील, उर्मिला पाटील, उज्वला गाडेकर, पल्लवी निर्मळ. जयश्री माळी यांनी प्रवासी मजुरांची रवानगी असो, ऑक्सिजन पुरवठा, बिले तपासणी, गरजवंतांना शिधा, औषधे, प्रवासी पास, बाहेरून येणारे लोक कोरटाईन करणे आवी बाबतीत दिलेले योगदान पथदर्शीच होते. त्याकाळात इतर सर्वच कर्मचारी वर्गाप्रमाणे या अधिकारी वर्गाने घर पाठीला ठेवून कर्तव्य बजावले.

श्रीगोंदा-पारनेर प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांचे जागी बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरचे प्रांताधिकारी गणेश राठोड यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. शिर्डी प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांचे जागी औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरचे प्रांताधिकारी माणिक आहेर यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.

रिक्‍त असलेल्या कर्जत प्रांताधिकारी पदी वर्धा जिल्हा प्रशासनातील नितीन पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. श्रीरामपूर प्रांताधिकारी असलेल्या अनिल पवार यांचे जागी जळगाव जिल्हा प्रशासनातील भूसंपादन अधिकारी असलेल्या किरण सावंत पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे.

किरण सावंत यांनी यापूर्वीच्या काळात कर्जत तहसोलदार तसेच अहमदनगर शहर अन्नधान्य वितरण अधिकारी म्हणून कामकाज पाहिले आहे. नगर प्रांत अधिकारी पदानंतर जिल्हा प्रशासनात विशेष भूसंपादन अधिकारी पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या उज्वला गाडेकर यांची बदली सातारा जिल्ह्यातील माण-खटाव प्रांताधिकारी पदी करण्यात आली आहे.

जिल्हा पुनर्वसन अधिकारी असलेल्या पल्लवी निर्मळ यांच्या जागी नंदुरबार जिल्हा प्रशासनातील रोजगार हमी शाखेचे उपजिल्हाधिकारी शाहूराज मोरे यांची नेमणूक करण्यात आली आहे. शाहूराज मोरे यांनी यापूर्वीच्या काळात जिल्हा प्रशासनात उपजिल्हाधिकारी म्हणून कामकाज पाहिले आहे. जिल्हा प्रशासनातील क्रमांक पंधराचे विशेष भूसंपादन अधिकारी पदी गौरी सावंत यांची नेमणूक करण्यात आली आहे.

गौरी सावंत या बुलढाणा निवडणूक शाखेत उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. दरम्यान या बदली आदेशात श्रीनिवास अर्जुन, सुधाकर भोसले, गोविंद शिंदे, अनिल पवार, संदीप चव्हाण, पल्लवी निर्मळ या उपजिल्हाधिकारी तथा प्रांत अधिकारी यांना नव्या जागी पदस्थापनेचे आदेश देण्यात आले नाहीत. या अधिकाऱ्यांना नव्या जागी नियुक्तीचे आदेश लवकरच जारी केले जाणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button