तरूणाला जीवे मारण्याचा प्रयत्न; दोघा भावांना न्यायालयाने दिली ‘ही’ शिक्षा

तरूणास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणार्या दया उर्फ बोंदू मच्छिंद्र नेटके व हरीष उर्फ कोंड्या मच्छिंद्र नेटके (दोघे रा. लालटाकी, भारस्कर कॉलनी, अहमदनगर) या सख्या भावांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. नातु यांनी दोषी धरून 10 वर्षे सक्तमजुरी व 19 हजार रूपये दंड, अशी शिक्षा ठोठावली आहे.
त्यांनी नोव्हेंबर 2019 मध्ये प्रकाश तात्या खंडागळे या तरूणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. प्रकाशचे वडील तात्या हरी खंडागळे यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
तात्या खंडागळे यांच्या घरासमोर दया नेटके व हरीष नेटके हे दोघे सख्ये भाऊ राहतात. 26 नोव्हेंबर, 2019 रोजी रात्री दया नेटके व हरीष नेटके यांचे आपसात वाद होऊन एकमेकांना शिवीगाळ चालू होती.
सदरच्या शिव्या तात्या खंडागळे यांचा मुलगा प्रकाश व नाती यांना ऐकु येत असल्याने प्रकाश यास ते सहन न झाल्याने त्याने घराचे बाहेर येऊन नेटके बधूंना म्हणाला,‘शिवीगाळ करू नका, येथे माझ्या मुली राहतात’.
त्यावर हरीष नेटके याने प्रकाशला शिवीगाळ व दमदाटी केली व अंगावर धावत जाऊन त्याला खाली पाडुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दया नेटके यास आवाज देवून,‘दया याला ठार मार, जीवंत सोडायचे नाही’, अशी चिथावणी दिली.
दयाने स्वतः चे घरात पळत जाऊन धारदार चाकु घेऊन प्रकाश यास जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या उजव्या बरगडीच्या खाली मारून त्यास गंभीर जखमी करून जीवे ठार माण्याचा प्रयत्न केला.
घटनेबाबत तोफखाना पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास पुर्ण झाल्यानंतर आरोपींविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदरचा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. नातु यांच्या न्यायालयात चालला.
सरकार पक्षाच्यावतीने एकुण सात साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाचा युक्तिवाद व फिर्यादी, जखमी साक्षीदार, वैद्यकिय अधिकारी यांच्या साक्षी व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे ग्राह्यधरून न्यायालयाने आरोपींना 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.
सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील मंगेश वसंतराव दिवाणे यांनी कामकाज पाहिले. खटल्याच्या सुनावणी दरम्यान पैरवी अधिकारी सहा फौजदार बी. बी. बांदल यांनी सहकार्य केले.