सासरच्या छळास कंटाळून बावीस वर्षीय विवाहितेने संपविले जीवन

पतीला कार खरेदी करण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी तिसगाव (ता. पाथर्डी) विवाहितेचा सासरी शारीरिक, मानसिक छळ करण्यात आला.
या छळास कंटाळून विवाहित महिला तेजश्री धिरज रांधवणे (वय 22 वर्षे) हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मयत मुलीचे वडिल आदिनाथ बाळदेव केळकर (रा. कासर पिंपळगाव, ता. पाथर्डी) यांच्या फिर्यादीवरुन पती धीरज बाबासाहेब रांधवणे, सासरे बाबासाहेब फकडराव रांधवणे, सासू सुनिता बाबासाहेब रांधवणे आणि दीर सुरज बाबासाहेब रांधवणे (सर्व रा. तिसगाव, ता. पाथर्डी) यांच्या विरोधात पाथर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, 13 ऑगस्ट 2020 रोजी तेजश्री केळकर यांचा विवाह धीरज रांधवणे यांच्याशी झाला. सुरुवातीला मुलीला सासरच्या लोकांनी चांगले नांदवले.
नंतर मार्च 2022 मध्ये पतीला कार घेण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये आनण्याची मागणी तजश्रीकडे केली जाऊ लागली. पैसे न दिल्याने विवाहितेचा पती व सासरच्या मंडळींनी शारीरिक, मानसिक छळ केला जाऊ लागला.
या त्रासाला कंटाळून तेजश्री रांधवणे हिने शनिवारी 23 एप्रिलला राहत्या घरी गळफास घेतला. याप्रकरणी पीडितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.