अहमदनगर ब्रेकिंग : शेतकऱ्यास मागितले दोन हजार महिला अधिकारी अडकली लाचेच्या सापळ्यात !

फेरफारची नोंद लावण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागितली. ती एका दुसऱ्या व्यक्तीच्या हातून स्वीकारली. ही लाच स्वीकारताना या व्यक्तीस रंगेहाथ पकडण्यात आले.
याप्रकरणी बेलापूरच्या मंडळाधिकारी सारिका भास्कर वांढेकर व खासगी इसम बाबासाहेब बाबुराव कदम (वय ५२, रा. राजुरी, ता. राहाता) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी लाच लुचपत विभागाच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले, की तक्रारदार हे शेतकरी असून ऐनतपूर शिवारातील ०.३५ हेक्टर क्षेत्र त्यांना वारसा हक्काने वाट्यास आलेले आहे.
त्याची फेरफार नोंद बेलापूर बुद्रुक विभागाच्या मंडळ अधिकारी सारिका भास्कर वांढेकर यांच्याकडे प्रलंबित होती. ही फेरफार नोंद घेण्यासाठी मंडळ अधिकारी वांढेकर यांनी दोन हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
या शेतकऱ्याने यासंदर्भात अहमदनगर येथील लाचलुचपत विभागाकडे संपर्क साधून तक्रार दाखल केली होती. त्यानुसार काल मंगळवारी (दि. ३० मे) बेलापूर येथे या तक्रारीची पडताळणी करण्यात आली.
पडताळणी दरम्यान यातील सारिका वांढेकर यांनी आरोपी कदम यांना तक्रार- दार यांच्याकडे लाच मागणी करण्यासाठी प्रोत्साहन दिले व कदम यांनी वांढेकर यांच्या करीता दोन हजार रुपयांची लाचेची मागणी करून ती लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले,
असे निष्पन्न झाले. त्यानुसार बेलापूर येथील मंडळाधिकारी कार्यालयात लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावला. या सापळ्यादरम्यान आरोपी कदम याने पंचांसमक्ष दोन हजार रुपयांची रक्कम तक्रारदार यांच्याकडून स्वीकारली. कदम यास रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईचे छायाचित्र घेण्यात आले आहेत.
ही कारवाई सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक शरद गोर्डे, पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे, पोलीस नाईक रमेश चौधरी, संध्या म्हस्के, सचिन सुद्रूक, दशरथ लाड आदींनी केली.
याबाबत लाचलुचपत विभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे, की कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या खासगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास अहमदनगर अँटी करप्शन ब्युरोशी संपर्क साधावा.