भीमजयंती साजरी न केल्याने अधिकाऱ्याच्या अंगावर अज्ञातांकडून शाईफेक

नुकतेच देशभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले. मात्र श्रीरामपुरात एक धक्कादायक घटना घडली आहे.
भीमजयंती साजरी केली नाही म्हणून अज्ञात व्यक्तींनी श्रीरामपूर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे डेप्युटी आरटीओ अधिकारी बच्छाव यांच्या अंगावर शाई फेकून निषेध केला.
याबाबत अधिक माहिती अशी, श्रीरामपूर येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली नाही. याचा निषेध म्हणून अज्ञात कार्यकर्त्यांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात गेले. तेथे डेप्युटी अधीकारी बच्छाव चर्चेसाठी आले असता कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंगावर काळी शाई फेकली.
या घटनेने तेथे एकच गोंधळ उडाला. येथील इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना बाजूला नेले. अज्ञान कार्यकर्ते तेथून निघून गेले. या घटनेचा निषेध म्हणून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.