दुर्दैवी: व्यायाम शाळा सुरू करण्यासाठी माहेरून पैसे न आणल्याने विवाहितेला…

अहमदनगर- व्यायाम शाळा सुरू करण्यासाठी माहेरून दोन लाख रूपये आणले नाही म्हणून विवाहितेचा सासरी छळ करण्यात आला. तिला मारहाण करून नांदविण्यास नकार दिला. याप्रकरणी पीडित विवाहितेने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती शुभम राजेश सारवान, सासू संगीता राजेश सारवान, सासरा राजेश रामस्वरूप सारवान, रामस्वरूप सारवान (सर्व रा. धोबीघाट आझम कॉलेजसमोर, कॅन्टोमेंट चाळ, पुणे), आत्यासासू सिमा राजेश नकवाल, राजेश नकवाल (दोघे रा. चंदननगर, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
फिर्यादीचा विवाह 27 डिसेंबर, 2021 रोजी शुभम सारवान याच्यासोबत झाला होता. विवाहनंतर पाच दिवसांनी फिर्यादी सासरी नांदत असताना सासरच्यांनी व्यायाम शाळा सुरू करण्यासाठी माहेरून दोन लाख रूपये घेऊन येण्यासाठी वेळोवेळी दमदाटी, शिवीगाळ केली. लाथाबुक्क्यांनी मारहाण करून उपाशीपोटी ठेवले. तसेच मानसिक, शारिरीक छळ करून क्रुरतेची वागणुक दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
यासंदर्भात फिर्यादी यांनी सोमवार, 26 डिसेंबर, 2022 रोजी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह सासरच्या सहा जणांविरूध्द गुन्हा केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार एस.बी.आडसूळ करीत आहेत.