दुर्दैवी: मातीचा ढिगारा अंगावर पडून मजूराचा मृत्यू

अहमदनगर- भुयारी गटारीचे खोदकाम सुरु असताना मातीचा ढिगारा अंगावर पडून एक परप्रांतीय मजूर ठार झाल्याची घटना देवळाली प्रवरा येथे घडली आहे. धिरज पूनम भावसार (वय 21) असे ढिगारा पडून मृत्यू झालेल्या मजूराचे नाव आहे.
देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या वतीने परिसरासाठी भुयारी गटार योजनेचे वर्षभरापासून काम सुरु झाले आहे. या कामाची सुरूवात राहुरी फॅक्टरी येथून सूरु झाली. सध्या हे काम देवळाली प्रवरा शहरात सुरु आहे.
दि. 5 रोजी देवळाली ते विटभट्टी रस्त्याचे गटार योजनेचे पाईप टाकण्यासाठी पोकलेनच्या सहाय्याने खोदकाम सुरु असतांना मातीचा ढिगारा अंगावर पडल्याने त्या खाली एक मजूर दबला गेला.
ही गोष्ट संबधीतांच्या लक्षात येताच त्याला मातीच्या ढिगार्याखालून बाहेर काढून दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी तो मयत झाला असल्याचे सांगितले. ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचा हा बळी आहे.
गेल्या वर्षभरापासून या योजनेचे काम सुरु असून शहरातील सर्व रस्ते खोदले गेल्याने रस्त्यांची पूर्णतः वाट लागली आहे. या योजनेचे काम कधी एकदा संपते असे नागरिकांना झाले आहे.