Ahmednagar Crime : चोरी करायला गेले अन् पकडले; एक पळाला

Ahmednagar Crime : चोरी करणार्या दोघांना नगर तालुका पोलिसांनी अटक केली आहे. रामायण ज्ञानदेव चव्हाण (रा. बुरूडगाव ता. नगर) व अक्षय रवींद्र चाबुकस्वार (रा. शास्त्रीनगर, केडगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
त्यांचा एक साथीदार नितीन कांबळे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. अरणगाव ता. नगर) हा पसार झाला आहे. रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास आरोपींनी अरणगाव शिवारात मेहेर इंग्लिश स्कूलच्या जवळ रोडच्या कडेला असलेली इलेक्ट्रीक वितरण पेटी चोरीचा प्रयत्न केला होता. तेथे दोघांना पकडण्यात आले आहे.
या प्रकरणी त्यांच्याविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता रामदास ढाकणे यांनी फिर्याद दिली आहे.
दरम्यान गुन्हा दाखल होताच सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या पथकाने आरोपींना अटक केली. त्यांचा एक साथीदार पसार झाला आहे. अधिक तपास महिला पोलीस अंमलदार हरीचंद्रे करीत आहेत.