क्लास घेणाऱ्या तरूणी सोबत केलं नको ते कृत्य; न्यायालयाने ठोठावली ‘ही’ शिक्षा

अहमदनगर- ओळखीचा फायदा घेत महिलेसोबत गैरवर्तन करणाऱ्या महेश अंबादास डाळींबकर (रा. माऊलीनगर, मिरी रोड, शेवगाव) यास येथील जिल्हा न्यायाधीश एम. आर. नातु यांनी शेवगाव येथील न्यायदंडाधिकारी वर्ग एक यांनी दिलेली शिक्षा कायम केली आहे. त्याला भादंवि कमल 354 (अ) नुसार एक वर्षे सक्त मजुरी व एक हजार रूपये दंड व दंड न भरल्यास सात दिवसाची साधी कैद तसेच भादंवि कलम 506 नुसार तीन महिने सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे.
सदर खटल्याचे कामकाज सरकार पक्षाच्या वतीने अॅड. मंगेश व्ही. दिवाणे यांनी पाहीले. सदर घटनेची थोडक्यात हकिकत अशी की, सदर पीडिता ही आरोपीकडे 2010 ते 2012 चे दरम्यान क्लास घेण्याचे काम करीत होती. त्यामुळे आरोपी व पीडितीची चांगली ओळख होती. दरम्यानचे कालावधी आरोपी हा पिडीतेस म्हणत असे की,‘माझे तुझेवर प्रेम आहे’. 20 एप्रिल, 2014 रोजी आरोपी याने पीडितेस घरी बोलावून तिच्या इच्छेविरूध्द शारिरीक अत्याचार केले म्हणून पीडितेने आरोपी विरूध्द फिर्याद दिली होती सदर केसमध्ये आरोपीस शिक्षा झालेली आहे.
1 मे, 2015 रोजी आरोपीने दुपारी शेवगाव तालुक्यातील एका गावात येऊन पीडितेच्या घरासमोर गाडी लावून, पीडितेचा हात धरून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले होते. सदर घटनेची आरोपी विरूध्द शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्या प्रमाणे कनिष्ठ न्यायालयात सदर केसची चौकशी होवून कनिष्ठ न्यायालयाने वर नमूद केल्याप्रमाणे शिक्षा दिलेली होती व सदर शिक्षा विरूध्द आरोपी याने येथील सत्र न्यायालयात फौजदारी अपील दाखल केले होते. सदर फौजदारी अपीलामध्ये आरोपी व सरकार पक्षाचा युक्तीवाद होवुन कनिष्ठ न्यायालयाने दिलेली वरिलप्रमाणे शिक्षा कायम ठेवली आहे.