अहमदनगर

‘अर्बन’ बँक दीडशे कोटींचे फसवणूक प्रकरण : पोलिसांनी केली ‘ही’ प्रक्रिया सुरू

अहमदनगर- बँकेच्या 28 संशयास्पद कर्जखात्यांसह सचिन गायकवाड व आशुतोष लांडगे यांनी मिळून बँकेची 150 कोटीची फसवणूक केल्याच्या राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल आहे. त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण आव्हाड करत आहेत.

 

या दीडशे कोटींच्या फसवणूक संदर्भात आर्थिक गुन्हे शाखेने बँकेतून ताब्यात घेतलेल्या कागदपत्रांचे, तसेच तपासात आढळलेल्या व्यवहार व अन्य बाबींचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यात येणार आहे. या संदर्भात प्रशासकीय प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.

 

 

तपासादरम्यान कर्जाच्या रकमेतील व्यवहारांच्या महत्त्वाच्या नोंदी समोर आल्या होत्या. थकीत कर्ज प्रकरणे मिटवण्यासाठी अथवा एनपीएतून बाहेर काढण्यासाठी दुसरे कर्ज करून त्या रकमा संबंधित कर्ज खात्यामध्ये वळवण्यात आल्याचे तपासात समोर आले होते. तसेच, कर्जाच्या रकमेचा गैरवापर होत असताना व सदर रकमा दुसर्‍या खात्यात वर्ग करताना संबंधित कर्जदाराच्या सह्या नसल्याचे समोर आले होते.

 

वेगवेगळ्या खात्यातून या रकमा फिरवत शेवटी ज्या व्यक्तीपर्यंत रक्कम गेली, त्याचा तपासही करण्यात आला आहे. तसेच, या प्रकरणात बँकेच्या तीन ते चार संचालकांसह काही अधिकार्‍यांचे जबाबही नोंदविण्यात आलेले आहेत.

 

तपासात प्राप्त झालेली कागदपत्रे, बँकेतील व्यवहारांच्या नोंदी, कर्ज प्रकरणे आदी सर्व बाबींचे फॉरेन्सिक ऑडिट होणार आहे. शासनाच्या पॅनल वरील ऑडिटरमार्फत ही सर्व तपासणी होणार असल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले. दरम्यान, फॉरेन्सिक ऑडिट झाल्यानंतर तपासात आढळलेल्या गैरप्रकारांची पुष्टी होऊन कारवाईला अधिक गती येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button