आजपासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला होणार सुरुवात

करोनाच्या नव्या विषाणूचा वेगाने प्रसार सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण आजपासून सुरू होत आहे.
मुलांच्या लसीकरणासाठी कोव्हॅक्सिन ही लस वापरण्यात येणार असून, राज्यातील ६५० केंद्रांवर सुमारे साठ लाख मुलांचे लसीकरण करण्यात येणार आहे.
१५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला आज, सोमवारपासून प्रारंभ होत असून, कोविन ॲपवर साडेतीन लाखांपेक्षा अधिक मुलांची नोंदणी झाली.
देशात १५ ते १८ वर्षे वयोगटातील १० कोटी मुले असून, त्यांना देण्यात येणाऱ्या लसींमध्ये भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीचा समावेश असेल.
मुलांना लसीच्या पहिल्या डोसनंतर २८ दिवसांनी दुसरा डोस दिला जाईल. मुलांना डोस देताना लसींची सरमिसळ होऊ नये म्हणून स्वतंत्र लसीकरण केंद्रे स्थापन करावीत, अशा सूचना केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी राज्यांना दिल्या आहेत.
लशीची भीती नको’ :- कोव्हॅक्सिन ही सर्वात सुरक्षित लस असल्याने पालकांनी अजिबात घाबरून न जाता मुलांचे लसीकरण करावे,
असा सल्ला ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. शरद आगरखेडकर यांनी दिला़ लस टोचल्यानंतर टोचलेली जागा लाल होणे, दुखणे किंवा ताप येणे हे सर्वसामान्य परिणाम दिसल्यास घाबरून जाऊ नये.
अर्धा तास लसीकरण केंद्रावर थांबावे. त्यानंतर घरी जावे. मात्र, मुलांना लस देण्याबाबत टाळाटाळ किंवा दिरंगाई करू नये, असेही डॉ. आगरखेडकर यांनी स्पष्ट केले.