वराळ खून प्रकरण: ‘त्या’ तपास अधिकाऱ्यास शिक्षा

अहमदनगर- पारनेर तालुक्यातील निघोजचे माजी सरपंच संदीप वराळ यांच्या खून प्रकरणात तपासातील चुकीचा तपास केल्याचा ठपका ठेवत तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी यांना एक वर्षाची पगारवाढ रोखण्याची शिक्षा देण्यात आली आहे. आनंद भोईटे असे त्यांचे नाव आहे.
गृहविभागाचे अवर सचिव यांनी दिलेल्या आदेशानुसार, निघोज येथील माजी सरपंच संदीप वराळ यांच्या खूनाचा तपास करतांना तत्कालीन विभागीय पोलीस अधिकारी भोईटे यांनी सादर कलेल्या दोषारोपपत्रात या खून प्रकरणातील संशयितांविरूद्धच्या जून्या मोक्का प्रकरणातील दोन साक्षीदारांच्या साक्ष रायटरच्या चुकीने या खून प्रकरणात जोडल्या गेल्या होत्या. वराळ खूनाची घटना घडली, तेव्हा यातील एक साक्षीदार मयत होता. तर दुसरा साक्षीदार घटना घडली, तेव्हा दक्षिण आफ्रिकेत नोकरीनिमित्त वास्तव्यास होता.
या साक्षीदारांच्या जबाबावर या गुन्ह्यातील संशयित असलेले बबन कवाद व मुक्तार इनामदार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेत याचिका दाखल केली. त्यानंतर खंडपीठात हे प्रकरण चालले व बनावट साक्षीदार दाखवल्याप्रकरणी तपासी अधिकारी भोईटे यांना दोषी धरून त्यांच्या कामाची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार गृहविभागाने भोईटे यांची विभागीय चौकशी केली.
यामध्ये खून खटल्यात नजर चुकीने दाखल झालेल्या दोन साक्षिदारांमुळे याचा खून खटल्याच्या निकालावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे नमुद करण्यात आले आहे. तसेच दोषारोप पत्र सादर करण्यापुर्वी पोलीस महासंचालकांची परवानगी घेतांना कागदपत्र बारकाईने तपासणे आवश्यक होती. ती तपासली गेली नाहीत. तसेच कामाच्या व्यापात वरिष्ठ अधिकार्यांनी ती वाचली नाहीत. यामुळे भोईटे यांनी हलगर्जी केल्याचा ठकपा ठेवण्यात आला आहे.
चौकशी अहवालानुसार गृहविभाने भोईटे यांना पुढील पगार वाढीवर परिणाम न होता एक वर्षाची पगार वाढ थांबवण्याची शिक्षा केली आहे. राज्यपालांच्या आदेशानंतर महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव चेतन निकम यांनी नुकताच हा आदेश दिला आहे. शिक्षा दिलेले भोईटे सध्या पुणे ग्रामिण विभागात बारामती येथे अपर पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत आहेत.
राज्य शासनाने केलेल्या कारवाईवर आम्ही समाधानी नाही. पगारवाढ रोखण्याची किरकोळ शिक्षा देवून राज्य शासन आनंद भोईटे यांना पाठीशी घालत आहे. ही बाब पुढील सुनावनीवेळी सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देवू. भोईटे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना शासकीय सेवेतून कायम स्वरूपी बडतर्फ करण्याची आमची मागणी आहे.
– मुक्तार इनामदार, बबन कवाद, तक्रारदार.