जिल्हा पोलिसांकडून हस्तगत वाहने, मौल्यवान वस्तू देण्यास सुरूवात

मागील महिन्यापासून आम्ही जिल्ह्यामध्ये जप्त केलेल्या मुद्देमाल तपासणीची मोहीम हाती घेतलेली आहे. महिना भरामध्ये आम्ही ही मोहीम सुरू करून आत्तापर्यंत आठ हजार 89 मुद्देमालांची निर्गती केले आहे.
जिल्ह्यामध्ये एकूण 25 हजार 589 मुद्देमाला आहे. त्याची आता पडताळणी सुरू केलेली आहे. ही मोहीम शेवटपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.
पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल नागरिकांना परत करण्याची प्रक्रिया जिल्हा पोलीस दलाकडून सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत 150 वाहने तसेच 24 सोन्या-चांदीच्या वस्तू न्यायालयाच्या आदेशाने मुळ मालकांना परत देण्यात आल्या आहेत.
याशिवाय जप्त मुद्देमालपैकी महिना भरामध्ये आठ हजार 89 मुद्देमालांची निर्गती केले असल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले. अधीक्षक पाटील म्हणाले, मुद्देमाल गहाळ झाल्याप्रकरणी शिर्डी व कोतवाली पोलीस ठाण्याची चौकशी सुरू आहे.
मुद्देमाल तपासणीमध्ये अनेक गंभीर त्रुटी आढळून आलेल्या आहेत. त्यामध्ये कोतवाली पोलीस ठाण्याच्या अंतर्गत काही प्रमाणामध्ये मुद्देमालात विसंगती असल्याचे निष्पन्न झाले आहे.
तर नगर तालुका पोलिसात मुद्देमाल सापडत नसल्यामुळे गुन्हाही दाखल झाला आहे. शिर्डी, कोतवाली पोलीस ठाण्यात मुद्देमाल गहाळ प्रकरणी विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.
गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी हस्तगत केलेला मौल्यवान वस्तूंचा मुद्देमाल सुरक्षित राहावा, या उद्देशाने तो मौल्यवान मुद्देमाल बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्याची परवानगी पोलीस ठाणे प्रभारी, उपविभागीय पोलीस अधिकारी यांना दिली आहे.
संबंधीत लॉकरचा खर्च शासकीय निधीतून करण्यात येणार असल्याचे अधीक्षक पाटील यांनी यावेळी सांगितले.