अहमदनगर

गावठी कट्ट्याचा धाक दाखवून लुटायचे; परप्रांतीय टोळी गजाआड

अहमदनगर- एमआयडीसी पोलिसांना रस्ता लुट करणारी परप्रांतीय सराईत गुन्हेगाराची टोळी गजाआड करण्यात यश आले.

 

असिम सईद बुखारी, नासीर गफार अब्दुल (दोघे रा. खुल्ताबाद, औरंगाबाद), मुस्ताक अहमद गुलाम रसुल शेख, अमरसिंग मटलुराम सिंग, पियुष कौशल शुक्ला, मेहबुब ईस्माईल शेख (सर्व मुळ रा. उत्तरप्रदेश, हल्ली रा. मुकुंदनगर) अशी गजाआड केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.

 

त्यांच्याकडून गावठी कट्टा, जिवंत काडतूस, वाहने असा नऊ लाख 93 हजार 728 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

 

मारूती चंद्रकांत जाधव (रा. कोंढवा खुर्द ता. हवेली, जि.पुणे) यांनी जालना येथुन ट्रकमध्ये 12 टन ज्वारी भरून ट्रक नगर- औरंगाबाद रोडने पुणे येथे घेवुन जात असताना त्यांची ट्रक 20 ऑक्टोबर, 2022 रोजी रात्री 2.30 वाजता इमामपुर घाट येथे चोरट्यांनी अडवली होती. जाधव यांच्याकडील मोबाईल, रोख रक्कम काढून घेवून त्यांचे हात, पाय, तोंड, डोळे बांधुन त्यांना नेवासा-शेवगाव रोडवर सोडून चोरटे ट्रक घेऊन पसार झाले होते. जाधव यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस उपअधीक्षक अजित पाटील (नगर ग्रामीण), सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत हंडाळ या गुन्ह्याचा तपास करीत होते.

 

तपासादरम्यान ट्रक दिंडोरी पोलीस ठाण्याचे हद्दीत बेवारस मिळुन आला. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन ट्रकमधील ज्वारी कुठे विक्री केली याचा तपास सुरू केला. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक अनोळखी इसम हा ज्वारी धान्य विक्रीसाठी घेऊन येत असल्याबाबत व सदर सदर ज्वारी विक्री केल्यानंतर रोख स्वरूपात पैसे मागत असल्याबाबत माहिती मिळाली. या माहितीवरून त्या अज्ञात इसमाचा मोबाईल नंबर मिळवून त्याचा शोध घेतला असता तो खुल्ताबाद येथे राहणारा असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास खुल्ताबाद येथून ताब्यात घेतले असता त्याने त्याचे नाव असिम सईद बुखारी असे सांगितले.

 

ट्रक चोरीचा गुन्हा त्याने खुल्ताबाद येथे राहणारा नासीर गफार अब्दुल याचेसह इतर परप्रांतीय चौघांच्या मदतीने केल्याची कबूली दिली. पोलिसांनी नासीर गफार अब्दुल व मुस्ताक अहमद गुलाम रसुल शेख, अमरसिंग मटलुराम सिंग, पियुष कौशल शुक्ला, मेहबुब ईस्माईल शेख यांना ताब्यात घेत अटक केली.

 

असीम बुखारी याचेकडुन मालेगाव येथुन एका गोदामातून 12 टन ज्वारीपैकी सात टन ज्वारी जप्त करण्यात आलेली असून, मुस्ताक शेख याचेकडुन गुन्ह्यात वापरलेली ओमीनी गाडी, दुचाकी हस्तगत करण्यात आलेली आहे.

 

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपअधीक्षक पाटील, एलसीबीचे निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक आठरे, उपनिरीक्षक हंडाळ, उपनिरीक्षक योगेश चाहेर, अंमलदार संदीप खेंगट, दीपक गांगडे, गणेश कावरे, गजानन गायकवाड, किशोर जाधव, भगवान वंजारी, सुरज देशमुख, ज्ञानेश्वर तांदळे यांचे पथकाने केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button