विषाणूजन्य आजारांचा विळखा ! घरोघरी याचे रुग्ण सापडत असल्याने खासगी दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी
शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव ढोरजळगाव परिसरामध्ये गेल्या - महिनाभरापासून पाऊस झाला. त्यामुळे जागोजागी पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणावर डासांची उत्पत्ती होऊन डास चावल्याने डेंग्यू मलेरियासारखे आजार वाढले आहेत.

भातकुडगाव वातावरणातील बदलांमुळे सर्दी, खोकला या विषाणूजन्य आजारांबरोबरच डेंग्यू मलेरिया, टायफॉइड, यासारख्या आजारांनी विळखा घातला आहे. या आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव ढोरजळगाव परिसरामध्ये गेल्या – महिनाभरापासून पाऊस झाला. त्यामुळे जागोजागी पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणावर डासांची उत्पत्ती होऊन डास चावल्याने डेंग्यू मलेरियासारखे आजार वाढले आहेत.
घरोघरी याचे रुग्ण सापडत असल्याने खासगी दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी वाढत असून मोठ्या रुग्णालयांमध्ये बेड शिल्लक नसल्याने जमिनीवर उपचार घेण्याची वेळ रुग्णांवर आली आहे.
रक्त चाचण्या आणि इतर तपासण्यांबरोबरच उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च वाढला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य परिस्थिती असणाऱ्या कुटुंबांना याची मोठी आर्थिक झळ सोसावी लागत आहे.
अनेक रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार घेत आहेत. तेथेही औषधांचा तुटवडा असल्याने उपचारांवर मर्यादा येत आहेत. थंडी- ताप, अंग दुखणे, थकवा, अंगावर लालसर पुरळ येणे, भूक मंदावणे अशी डेंग्यूची प्रमुख लक्षणे आहेत.
आपल्या घराभोवतालच्या परिसराची स्वच्छता राखावी, कुठेही पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी व आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. काही लक्षणे आढळल्यास प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन ढोरजळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशील बडे यांनी केले आहे.