खंडपीठाच्या आदेशाने आर्थिक गुन्हे शाखेला जाग; ‘त्या’ संचालकांविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल

आश्रमशाळेतील शिक्षक व कर्मचारी यांची नोकरीच्या आमिषाने सुमारे दोन ते अडीच कोटी रूपयांची फसवणूक करणार्या सद्गुरू रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या संचालक मंडळाविरूध्द दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
खजिनदार अनिता सुभाष साळवे, सदस्य संजय बन्सी साळवे, रेखा संजय साळवे (सर्व रा. आलमगीर रोड, भिंगार), सचिव अनिल तुळशीराम शिंदे, उपाध्यक्ष मंगल अनिल शिंदे (दोघे रा. इंदिरानगर, श्रीरामपूर), राजू बन्सी साळवे (रा. खांडगाव ता. पाथर्डी), अनुराग सुभाष साळवे (रा. आलमगीर, भिंगार) अशी दोषारोपपत्र दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आदेश दिल्याने आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सर्व आरोपींविरूध्द न्यायालयात हे दोषारोपपत्र दाखल केले आहे.
सुरूवातीला पोलिसांनी संस्थापक अध्यक्ष सुभाष बन्सी साळवे (रा. आलमगीर रोड, भिंगार) हा दोषी आढळल्याने त्याच्याविरूध्द दोषारोपपत्र दाखल केले होते.
यानंतर फिर्यादी यांच्याकडून खंडपीठात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकेवर सुनावणी होऊन दोषारोपपत्र दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
यानंतर उर्वरित आरोपींविरूध्द दोषारोपपत्र दाखल झाले आहेत. सद्गुरू रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित सद्गुरू रोहिदासजी अनु. जाती केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा खांडगाव (ता. पाथर्डी) तसेच वडारवाडी,
भिंगार येथील आश्रमशाळेतील शिक्षक व कर्मचारी यांना संचालक मंडळाने नोकरीचे आमिष दाखवून तसेच 2013 ते 2019 पर्यंत विनावेतन कामकाज करून घेऊन त्यांचे नावे आलेले मानधन कर्मचार्यांना न दिल्याने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात संचालक मंडळावर 20 गुन्हे दाखल झाले होते. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.