दरोडा टाकायला निघाले अन् पोलिसांच्या तावडीत सापडले; शस्त्रसाठ्यासह टोळी जेरबंद

अहमदनगर- सराईत गुन्हेगारांसह दरोडा टाकण्याच्या तयारीत असणारी टोळी नगर तालुका पोलिसांनी पकडली. त्यांच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल व घातक शस्त्रसाठा जप्त केला आहे. वडगाव तांदळी (ता. नगर) शिवारात काल रात्री पोलिसांनी ही कारवाई केली.
अजय गजानन काळे (वय 20 रा. तांबेमळा, बुरूडगाव ता. नगर) शक्ती भागुजी भोसले (वय 30), गिरधर पुंजाबाप्पु भोसले (वय 50, दोघे रा. निमगाव चोभा, ता. आष्टी जि. बीड), हरिदास आगुचंद काळे (वय 45 रा. वाकी ता. आष्टी, जि बीड) यांना अटक करण्यात आली आहे. तर हर्षल हबर्या काळे (रा. देऊळगाव सिद्धी ता. नगर) हा पसार झाला आहे. पाच जणांविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगर तालुका पोलिसांचे पथक हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन करत असताना निरीक्षक सानप यांना माहिती मिळाली की, एक टोळी हत्यारासह रूईछत्तीशी ते वडगाव तांदळी जाणर्या रोडने कुठेतरी दरोडा घालण्यासाठी जात आहेत. पोलिसांच्या पथकाने वडगाव तांदळी शिवारात सापळा लावून अजय काळे हा व त्याचे साथीदार येण्याची वाट पाहत रोडचे कडेला झाडाझुडपाचे आडबाजुला दबा धरून बसले असता रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास रूईछत्तीशी बाजुकडुन वडगाव तांदळी गावाकडे काही इसम दुचाकीवर येताना दिसले. तेव्हा पोलिसांच्या पथकाने त्यातील चौघांना पकडले.
त्यांच्या अंगझडतीमध्ये गावठी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत काडतूस, दुचाकी, मोबाईल, चाकू असा एक लाख 13 हजार 500 रूपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. सदरचे इसम हे कोठेतरी दरोडा टाकण्याचे तयारीत असल्याची खात्री झाल्याने पोलिसांनी त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करत अटक केली आहे.