
पारनेर, बेलवंडी, तसेच नगर तालुक्यात घरफोडी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सोमवारी (दि. २५) यश आले. आरोपींकडून दोन लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
अटक केलेले आरोपींविरोधात जिल्ह्यातील श्रीगोंदा, पारनेर, नगर, पुणे पोलिस ठाण्यात चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. शाहरुख आरकस काळे (वय २५, रा. रांजणगाव मशिद, ता. पारनेर),
राजेश अशोक काळे (वय २०, रा. धाडगेवाडी, ता. पारनेर), रुषी अशोक काळे (वय २०, रा. रांजणगाव मशीद, ता. पारनेर) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. तालुक्यातील उक्कडगाव येथील ग्रामस्थ दादासाहेब गंगाराम शेळके यांच्या घराचा दरवाजा उघडून चोरट्यांनी ४० हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले होते.
याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा नोंद झाला होता. पारनेर व नगर तालुक्यातील घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना,
सराईत आरोपी शाहरुख काळे हा त्याच्या साथीदारांसह चोरीचे दागिने विक्रीसाठी सुपा येथे येणार आहेत, अशी गोपनीय माहिती पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली.
त्या आधारे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुपा येथील सोनार गल्लीत सापळा रचला. त्यात वरील आरोपी व त्याचे साथीदार अलगद अडकले.
त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी पारनेर, बेलवंडी, मिरजगाव, नगर तालुका परिसरातून चोरी केलेले दागिने विक्रीसाठी आलो असल्याची कबुली आरोपींनी दिली. आरोपीविरोधात विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.