भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या महिलेवर कोयत्याने हल्ला

मुलाला शिवीगाळ करणार्यास विरोध करण्यासाठी गेलेल्या महिलेवर कोयत्याने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात महिला जखमी झाली आहे.
सुरेखा शंकर वाकळे (वय 35 रा. महात्मा फुले चौक, अहमदनगर) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी इजाज गफार शेख (रा. गाझीनगर, अहमदनगर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. महात्मा फुले वसाहतीच्या कमानीजवळ ही घटना घडली आहे.
सुरेखा वाकळे यांच्या मुलाला इजाज शेख हातामध्ये कोयता घेऊन मोठमोठ्याने शिवीगाळ करत होता. सुरेखा सोडविण्यासाठी मध्ये गेल्या असता इजाजने त्यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. सदर झटापटीत इजाजच्या हातातील कोयता सुरेखा यांच्या पायाला लागून त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.
घटनास्थळी शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे, पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन करीत आहेत.