काय सांगता: म्हणून त्याने केला ‘हा’ उद्योग …!

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या माजी प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देणारा आरोपी नगर मधील असल्याचे निष्पन्न झाले असून नगर तालुका पोलिसांच्या पथकाने त्याला नगर तालुक्यातील चिंचोडी पाटील गावातून ताब्यात घेत पुणे क्राईम ब्रांचच्या स्वाधीन केले आहे.
भाऊसाहेब रामदास शिंदे असे या धमकी देणाऱ्याचे नाव आहे. या व्यक्तीने चाकणकर यांना धमकीचा फोन करून पुढील ७२तासात जीवे मारू अशी धमकी दिली होती.
या धमकीनंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. दिल्ली येथे असणाऱ्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या हेल्पलाइन नंबरवर सोमवारी दुपारी 3 वाजून पन्नास मिनिटांनी एका व्यक्तीने फोन केला होता.
त्यामध्ये त्या व्यक्तीने रुपाली चाकणकर यांचे नाव घेऊन त्यांना पुढील ७२ तासात जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दिल्ली येथील राष्ट्रीय महिला आयोगाच्या कार्यालयाने मुंबई येथील राज्य महिला आयोगाच्या कार्यालयाशी संपर्क करून ही माहिती दिली.
त्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती कळविण्यात आली होती. दरम्यान या नंबरवरून फोन आला त्या व्यक्तीशी संपर्क केला असता ती व्यक्ती नगर जिल्ह्यातील असल्याचे समजले होते.
त्यानंतर नगर जिल्ह्यातील पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून त्या व्यक्तीचा शोध घेतला असता ती नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील या गावातील असल्याचे समजले.
नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप व त्यांच्या पथकाने मंगळवारी (दि.३१) सकाळीच चिचोंडी पाटील येथे जाऊन शिंदे यास ताब्यात घेतले.
त्यानंतर त्याला पुणे क्राईम ब्रांचच्या स्वाधीन केले आहे. शिंदे याने धमकीचा फोन चिचोंडी पाटील गावातून केल्याचे सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झाले.
तो मूळचा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील रहिवासी असून काही दिवस तो मुंबई येथे परिचर म्हणून नोकरीस होता. नोकरी सोडून तो पत्नी समवेत सध्या चिचोंडी पाटील गावात राहात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
महिला आयोगाने तक्रारीची दखल न घेतल्याने केला हा उद्योग तर या प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेला भाऊसाहेब शिंदे यांनी खळबळजनक दावा केला आहे.
काही लोकांनी सॅटेलाईट द्वारे माझ्या मेंदूचा ताबा घेतला असून सॅटेलाईट द्वारे माझ्या पत्नीलाही त्रास दिला आहे. या बाबत माझ्या कडे सर्व पुरावे असल्याचा दावा शिंदे करत आहे.
याबाबत मी महिला आयोगाकडे तक्रारही दिली आहे, मात्र माझ्या तक्रारीची दखल घेत नसल्याने मी हा सर्व खटाटोप केला असून यामुळे आता मला पोलिस संरक्षण मिळाले तर आहेत आणि माझी बाजू मी न्यायालयासमोर मांडू शकेल असेही भाऊसाहेब शिंदे याने पोलिसांना सांगितलं.