नगर अर्बनच्या पैशांतून खरेदी केलेली 70 एकर जमीन जप्त होणार?

अहमदनगर- नगर अर्बन बँकेत अडकलेल्या ठेवी परत मिळत नसल्याने कर्जत येथील ठेवीदारांनी येत्या प्रजासत्ताक दिनी येथील पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई करण्याची मोहिम हाती घेतली आहे.
नगर अर्बन बँकेच्या एका कर्जदारास जमीन खरेदीसाठी दिलेल्या सुमारे तीन कोटीच्या कर्ज रकमेतून श्रीगोंदे तालुक्यात खरेदी केलेली सुमारे 70 एकर जमीन येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर आली आहे.
संबंधित जमिनीच्या खरेदी-विक्रीचे होणारे व्यवहार पाहून आर्थिक गुन्हे शाखेने तातडीने संबंधित शासकीय कार्यालयांशी पत्र व्यवहार करून जमिनीची माहिती मागवली आहे.
केंद्र सरकारशी संबंधित असलेल्या बँकेच्या काही माजी पदाधिकार्यांनी कर्जत व श्रीगोंदे तालुक्याच्या काही भागातून महामार्ग जाणार असल्याने त्यावेळी जमिनीला किंमत येईल, या हिशोबाने श्रीगोंदे तालुक्यातील एका गावात सुमारे 70 एकर जमीन खरेदी करून ठेवली आहे. सत्ताधार्यांशी संबंधित एका कर्जदाराला तीन कोटी कर्ज देऊन त्याच्या नावे ही जमीन खरेदी झाल्याचे समजते. आर्थिक गुन्हे शाखेने बँकेच्या कर्ज खात्यांचे फॉरेन्सिक ऑडीट सुरू केले असून, त्याच्या तपासणीत या जमीन खरेदीसाठी बँकेतून पैसे वर्ग झाल्याचे समोर आल्याने पोलिसांनी तातडीने हालचाली करून तसेच या संबंधित जमिनीच्या विक्रीचे होणारे व्यवहार व चर्चा पाहून तातडीने संबंधित शासकीय कार्यालयांशी पत्र व्यवहार केला आहे.
जमिनीशी संबंधित संचालकांचीही चौकशी होणार असल्याचे समजते. या घटनेमुळे बँकेच्या सत्ताधारी वर्तुळात भूकंप झाल्याची स्थिती आहे.
जमिनीच्या खरेदी खताविषयी संबंधीत कार्यालयाकडे माहिती मागितली आहे. त्यांना पत्र पाठविले आहे. याबाबत अद्याप आम्हाला माहिती मिळाली नाही. माहिती मिळाल्यानंतर याविषयी पुढील कार्यवाही केली जाईल.
– पोलीस उपअधीक्षक कमलाकर जाधव (आर्थिक गुन्हे शाखा)