अहमदनगर

अहमदनगर जिल्ह्यातील हा नेता होणार भाजपा प्रदेशाध्यक्ष ?

नवं सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपमध्ये संघटनात्मक बदलाच्या हालचालीना वेग आल्याचे समजते. भाजप प्रदेशाध्यक्षाची धुरा नव्या नेत्याच्या खांद्यावर देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

त्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील राम शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याचे समजते. सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा कालावधी फेब्रुवारीपर्यंत आहे.

चंद्रकांत पाटील यांना मंत्रिमंडळात संधी मिळाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष पदासाठी नवा चेहरा दिला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. तसेच प्रदेश पातळीवरही इतर पदांमध्येही फेरबदल केले जाऊ शकतात, अशा चर्चांना वेग आला आहे.

दरम्यान, शिंदे सरकारने विधानसभेत बहुमत सिध्द केल्यानंतर लगेचच विरोधकांनी मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिले आहेत. शिवसेनेतील 40 बंडखोर आमदारांसह भाजपच्या 106 आणि अपक्षांना अडीच वर्ष सांभाळताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कस लागणार आहे.

मंत्रिमंडळाच्या विस्तारात अनेक समीकरणांचा विचार करणं महत्वाचं ठरणार आहे. शिंदे सरकारने आता काम सुरू केले असून आमदारांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहेत.

महाराष्ट्रात पुढील काळात यश मिळवून देणारा कारभार करणारे सरकार तयार करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. मंत्री निवड काटेकोरपणे करावी लागणार असून त्याबाबत कोणतीही घाई करायची नाही, असे ठरले असल्याचे समजते. येत्या काही महिन्यातच होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सरकारची परिक्षा पाहणाऱ्या ठरणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button