पोलीस दलात बदल्यांचे वारे; ‘या’ पोलीस ठाण्याला मिळाले प्रभारी अधिकारी

अहमदनगर- जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पदभार स्वीकारताच अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या जिल्हा पोलीस दलातील पोलिसांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू केली आहे.
यामुळे जिल्ह्यातील संगमनेर तालुका, राजुर, साई मंदिर सुरक्षा व बेलवंडी पोलीस ठाण्यात असलेले प्रभारी राज संपुष्ठात आले आहे. या ठिकाणी पूर्ण वेळ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांची नियुक्ती केली आहे. तसे आदेश अधीक्षक ओला यांनी काढले आहेत.
येथील आर्थिक गुन्हे शाखेत नियुक्तीस असलेले पोलीस निरीक्षक अरूण आव्हाड यांची बदली संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. येथील स्थानिक गुन्हे शाखेत नियुक्तीस असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे यांची राजुर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील मानवसंसाधन शाखेचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे यांची बेलवंडी पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. मानवसंसाधनचा अतिरिक्त पदभार नियंत्रण कक्षाचे निरीक्षक बाजीराव पोवार यांच्याकडे देण्यात आला आहे. येथील महिला व बाल अपराध प्रतिबंधक कक्ष आणि भरोसा सेलचे निरीक्षक राजेंद्र इंगळे यांची बदली साई मंदिर सुरक्षा, शिर्डी येथे करण्यात आली आहे.
दरम्यान तत्कालिन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी येथील मुख्यालयात कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती दिली होती. यातील 37 उपनिरीक्षकांना जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे निर्गती व बंदोबस्तासाठी नियुक्ती देण्यात आली आहे.
दरम्यान पोलीस अधीक्षक ओला यांनी गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या पोलीस अधिकार्यांच्या बदल्या सुरू केल्या आहेत. यामुळे कर्मचार्यांना देखील बदलीची आस लागली आहे. स्थानिक गुन्हे शाखेसह (एलसीबी) जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यात बदलीपात्र पोलीस अंमलदार आहेत. त्यांच्या बदल्या कधी होणार याकडे लक्ष लागले आहेत.
येथील एलसीबीमध्ये मंजूर संख्या बळापेक्षा जास्त अंमलदारांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यातील 35 ते 40 अंमलदार बदलीपात्र आहेत. याशिवाय चार ते पाच अंमलदार गेल्या 10 ते 12 वर्षांपासून एलसीबीतच कार्यरत आहेत. त्यांची बदली कधी होणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.