अहमदनगर

Women IPL : अहमदनगरची ही मुलगी आयपीएलमध्ये खेळणार !

पाथर्डी (Pathardi) सारख्या ग्रामीण भागातील एस वी नेट अकॅडमीची महिला क्रिकेटर आरती शरद केदारची शनिवारी आयपीएलमध्ये निवड झाल्याने जिल्ह्यातील प्रथम महिला आयपीएल खेळण्याचा मान केदारला मिळणार आहे.

केदार हिचे प्राथमिक शिक्षण हात्राळ गावातील शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण पाथर्डीतील एम. एम. निन्हाळी विद्यालयात तर आता बाबूजी आव्हाड विद्यालयात कला शाखेत आरती तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे.

पाथर्डी तालुक्यातील हात्राळ येथील अष्टपैलू क्रिकेटपटू आरती केदार हि भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या वरिष्ठ महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत आरतीने सर्वाधिक १५ विकेट घेतल्या होत्या.

तसेच यापूर्वी तिने महाराष्ट्र संघाकडून खेळतानाही चमकदार कामगिरी केलेली आहे. १९ वर्षांखालील महाराष्ट्राच्या संघात केदारने अष्टपैलू कामगिरी करीत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.

२०२१ मध्ये झालेल्या वरिष्ठ महिला एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या स्पर्धेसाठी तिची निवड झाली होती. आता २३ मेपासून होणाऱ्या महिला आयपीएल स्पर्धेत आरती व्हेलोसिटी या संघाकडून खेळताना दिसणार आहे.

जिल्ह्यातून आयपीएलसाठी निवड झालेली आरती ही पहिली महिला क्रिकेटर ठरली आहे. अँड प्रताप ढाकणे यांच्या प्रेरणेतून एस व्ही नेट अकॅडमीची वाटचाल सुरू असून अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक शशिकांत निऱ्हाळी यांच्या मार्गदर्शनाखाली आरती ही पाथर्डी येथील एस व्ही नेट ॲकॅडमीमध्ये सराव करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button