तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू ! गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन

नेवासे तालुक्यातील घोडेगावमधील जुना चांदारोड शिवारातील अशोक नहार यांच्या शेतातील विहिरीमध्ये काम करण्यास गेलेल्या शिवा एकनाथ सावंत (वय २६) याचा मंगळवारी विहिरीत बुडून मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेनंतर मृत तरुणाच्या नातेवाईकांनी कामास घेऊन गेलेल्या मालकावर सुरक्षेच्या उपाययोजना न करता त्यास विहिरीत खाली उतरवले. त्याचा मृत्यू होऊ शकतो हे माहीत असूनही विहिरीत सोडले यात तरुणाचा मृत्यू झाला म्हणून विहीर मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत सोनई पोलिस ठाण्यासमोर गर्दी केली.
जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा घेतल्यामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळपर्यंत शेकडो नातेवाईक सोनई पोलिस स्टेशन बाहेर बसून होते.
सोनई पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. दरम्यान पीएम रिपोर्ट आल्यावर बुधवारी सकाळी मृत तरुणाचे वडील एकनाथ सावळा सावंत (घोडेगाव) यांच्या फिर्यादीवरून अशोक नहार, अजय अशोक नहार, अभय अशोक नहार, अशोक नहार यांचा नोकर (नाव माहीत नाही) सर्व घोडेगाव या चौघांच्या विरोधात तक्रार दिली.
घोडेगाव येथील अशोक नहार यांच्या विहिरीतील इलेक्ट्रॉनिक मोटर काढण्यासाठी मुलगा शिवाजी एकनाथ सावंत यास अशोक नहार, अजय अशोक नहार, अभय अशोक नहार व त्यांचा नोकर हे सर्व घेऊन गेले.
त्यांनी विहीरीवर इतर लोक हजर असताना फिर्यादीचा मुलगा शिवाजी यास विहिरीमध्ये उतरवून त्याची सुरक्षिततेची कोणत्याही प्रकारची काळजी न घेता त्याचे मृत्यू होऊ शकतो, हे माहीत असताना सुद्धा त्यास विहीरीमध्ये उत्तरवले. फिर्यादीचा मुलगा शिवाजी याचा सदोष मनुष्यवध केला. फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सोनई पोलिस ठाण्याचे सपोनि ज्ञानेश्वर थोरात करीत आहेत.